पुरुषांच्या तुलनेत महिला आणि मुलांवर कोरोनाव्हायरसचा परिणाम कमी दिसतोय. मृतांमध्येही महिला आणि मुलांची संख्या कमी आहे.
चायनीज सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल याविषयीची पाहणी केली आणि त्यातून ही माहिती मिळाली आहे.
कोरोनाव्हायरसचा संसर्ग झालेल्या 44,000 लोकांबाबत हा अभ्यास करण्यात आला. यापैकी 2.8% पुरुष आणि 1.7% महिलांचा मृत्यू झाला.
वयाच्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर विषाणू संसर्ग झालेल्या 0.2% लहान मुलं आणि तरुणांचा मृत्यू झाला. तर 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 15% लोकांचा मृत्यू झाला आहे.
म्हणजे महिला आणि मुलांमध्ये कोरोना व्हायरसची लागण होण्याची भीती कमी असल्याचं या आकडेवारीवरून म्हणायचं का?
याचे दोन पैलू आहेत.
संसर्गाचा प्रतिकार करण्याची शक्ती
महिला आणि मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण कमी आहे किंवा त्यांचं शरीर या विषाणूशी अधिक चांगल्या पद्धतीने लढतं, हे याचं एक कारण असू शकतं.
युनिव्हर्सिटी ऑफ एक्स्टरचे डॉक्टर भरत पनखनिया सांगतात, "सहसा नवीन विषाणूचा सगळ्यांनाच संसर्ग होतो. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे."
या विषाणूशी लढण्यासाठीची प्रतिकारक शक्ती नसल्याने असं होतं. पण जेव्हा एखादा विषाणू पसरू लागतो, तेव्हा मुलांना त्याची कमी लागण होते.
किंग्स कॉलेज लंडनच्या डॉक्टर नॅटली मॅकडरमट सांगतात, "पालक मुलांची काळजी जास्त घेतात, त्यांना धोक्यांपासून दूर ठेवतात म्हणून मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण कमी असू शकतं. "
महिलांचं काय?
कोरोनाव्हायरसमुळे झालेल्या मृत्यूंमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचं प्रमाण कमी आहे. पण संशोधकांना याचं आश्चर्य वाटत नाही.
फ्लूसह इतर संसर्गांबाबतही हेच पहायला मिळतं.
जीवनशैलीमुळे पुरुषांची तब्येत ही महिलांच्या तुलनेत खराब असते. धूम्रपान आणि दारू पिण्याचं प्रमाण महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त असतं.
डॉक्टर मॅकटरमट सांगतात, "धूम्रपानामुळे तुमच्या फुफ्फुसांचं नुकसान होतं आणि ही चांगली बाब नाही."
चीनबाबत हे जास्त लागू असण्याची शक्यता आहे कारण एका आकडेवारीनुसार इथे धूम्रपानाचं प्रमाण पुरुषांमध्ये 52% तर महिलांमध्ये 3% आहे.
पण सोबत पुरुष आणि महिलांमधली रोगप्रतिकारक शक्ती एखाद्या संसर्गाला कसं प्रत्युत्तर देते, यावरही हे अवलंबून आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट आंग्लीयचे प्राध्यापक पॉल हंटर सांगतात, "महिलांची रोग प्रतिकारक शक्ती पुरुषांपेक्षा वेगळी असते. ऑटो इम्यून डिसीजेस (रोग प्रतिकारक यंत्रणा अति सक्रीय झाल्याने होणारे आजार) होण्याचा धोका महिलांना जास्त असतो."