राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जानेवारी महिन्य़ात झालेल्या पहिल्या महाअधिवेशनात पक्षाचा नवा झेंडा सादर केला. याबरोबरच अमित ठाकरेंकडेही पक्षात नवीन जबाबदारी सोपविण्यात आली. आज वाशी येथे झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली. या कॅबिनेटमध्ये अमित ठाकरे यांच्याकडे पर्यटन विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
मनसेच्या जानेवारी महिन्यात झालेल्या महाअधिवेशनात अमित ठाकरेंना अधिकृतपणे सक्रिय राजकारणात लाँच केलं जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. हा अंदाज खरा ठरला. अमित ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे.
नेतेपदी निवड झाल्यानंतर अमित ठाकरेंनी महाअधिवेशनात 'शिक्षण' या विषयावर ठराव मांडला. तसंच अमित ठाकरेंच्या नेतृत्वात हि शिक्षण परिषद आयोजित करण्यात येईल, असंही या अधिवेशनात जाहीर करण्यात आलं होतं.
एकीकडे भगवा झेंडा आणि त्यावर शिवाजी महाराजांची राजमुद्रा वापरुन शिवसेनेकडून निसटत चाललेला आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा मनसे आपल्याकडे ओढत आहे का? तसंच आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून तरुण मतदारांना आकर्षित करण्याच्या शिवसेनेच्या मनसुब्यांना अमित ठाकरेंच्या रूपानं आव्हान देण्याचा मनसेचा प्रयत्न आहे का?
एवढंच नव्हे तर, एकीकडे उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे मंत्री झाले असताना दुसरीकडे अमित यांच्याकडे अल्पावधीतच 'मनसे'चे नेते म्हणून जबाबदारी दिली जाणं, हा केवळ राजकीय योगायोग म्हणावा की ठाकरेंच्या नव्या पीढीचं राजकीय द्वंद्व आता महाराष्ट्राच्या पटलावर पाहायला मिळणार, असाही प्रश्न अनेकांना पडला होता..
"अमित पक्षात सक्रिय आहेत आणि लोकप्रियही आहेत. महत्त्वाच्या बैठकांनाही ते असतात. त्यांच्यावर जबाबदारी देणं पक्षासाठी योग्य ठरेल कारण प्रत्येक ठिकाणी राज ठाकरे पोहोचू शकत नाहीत," असं मनसे'चे नेते संदीप देशपांडेंनी 'बीबीसी मराठी'शी बोलताना म्हटलं होतं.
- मनसेच्या बॅनरवर झळकणारा 'महाराष्ट्र धर्म' नेमका आहे तरी काय?
- पहिल्या महाअधिवेशनात मनसेचा वैचारिक आणि राजकीय गोंधळ थांबेल?
वर्षभरापूर्वी जानेवारी 2019 मध्ये त्यांचा विवाह झाला तेव्हा राज्याच्या आणि राष्ट्रीय राजकारणातले अनेक दिग्गज आवर्जून उपस्थित होते. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतल्या अनेक मोठ्या कलाकारांचीही उपस्थिती होती.
अमित ठाकरे गेल्या पाच वर्षांपासून ते पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये सक्रिय आहेत. गेल्या काही काळात पक्षातला त्यांचा वावर वाढलाय, पक्षाच्या बैठकांनाही त्यांची हजेरी असते, मनसेच्या आंदोलनांमध्येही ते वेळोवेळी दिसताहेत.
उद्धव ठाकरेंच्या शपथविधी दिवशी (26 नोव्हेंबर) अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेनं नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाच्या थकित रकमेसंदर्भात थाळीनाद आंदोलन केलं होतं. त्याआधी जुलै महिन्यात पक्षाचं शिष्टमंडळ घेऊन रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांसाठी ते रेल्वेच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटले होते.
पर्यावरणविषयक मुद्द्यांवरही त्यांनी वारंवार मतप्रदर्शन केलं आहे. 'आरे'तील वृक्षतोडीवरून मुंबईत घमासान माजलेले असताना त्यांनी सोशल मीडियावर ही झाडं तोडण्याच्या विरोधात भूमिका घेतली होती.