"जेव्हा एखादी मालिका, एखादा प्रोजेक्ट संपतो, तेव्हा आपण लोकांपासून इंडस्ट्रीपासून लांब गेलेलो असतो. कॉन्टॅक्टमध्ये नसतो. प्रोजेक्ट सुरू असताना लोक आपल्याला रोज बघत असतात. पण तो संपल्यावर सोशल मीडिया, इंटरव्ह्यू कमी होतात आणि लोक विसरतात आपल्याला. म्हणजे अगदीच विसरतात असं नाही म्हणता येणार, पण जे नवीन प्रोजेक्ट, मालिका सुरू असतात त्यावर सगळं लक्ष केंद्रित होतं. हा काळ खरंतर खूप अवघड असतो."
"राजकन्या संपली आणि मी घरी परत आले. तेव्हा नातेवाईक किंवा आजूबाजूचे भेटायला येणारे लोक एकच प्रश्न विचारायचे...आता काय सुरू आहे? तेव्हा मला असं वाटायचं, की माझी सीरिअल काल संपलीये...मी आज सकाळी साताऱ्यात आलीये आणि तुम्ही मला विचारताय, की आता काय सुरू आहे? मी त्यांनाही दोष देत नाहीये. कारण त्यांनाही बऱ्याचदा माहीत नसतं, की कामं अशी नसतात. एक काम संपलं की दुसरं काम लगेच मिळालंय किंवा येईल ते काम केलंय. पण या गोष्टींबद्दल ते अनभिज्ञ असतात. सुरूवातीला या प्रश्नावर माझी खूप चीडचीड व्हायची. आता मी त्यांना समजावून सांगायला लागलीये, की कामं येताहेत, पण चांगलं काम मिळेपर्यंत थांबायचं आहे. सीरिअलचं हेक्टिक शूटिंग नुकतंच संपलंय, त्यामुळे थोडा ब्रेक घेतीये. स्वतःवर काम करतीये."