संपत चाललेल्या पाण्याच्या बाटल्या... दुकानांसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा... हँड सॅनिटायझर आणि टॉयलेट पेपर यांची टंचाई... खाण्यापिण्यासाठी, दैनंदिन वापरासाठी आवश्यक वस्तूंचा साठा करणारे लोक... अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये याच प्रकारचं दृश्य पाहायला मिळत आहे.
मागच्या आठवड्यात मी एका दुकानात पाण्याची बाटली विकत घेण्यासाठी गेलो होतो. दुकान रिकामं असल्याचं पाहून मला आश्चर्य वाटलं. असं झाल्याचं मी कधीच पाहिलं नव्हतं.
या दुकानातल्या सामान ठेवण्याच्या मोठ्या ट्रॉली पूर्णपणे रिकाम्या होत्या. बटाटे, गाजर संपले होते. दुकानाबाहेर उभे असलेले सुरक्षारक्षक ट्रॉल्यांचे हँडल स्वच्छ करत होते.
विकायला ठेवलेल्या वस्तू लवकर संपत आहेत. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर या, असा सल्ला एका कर्मचाऱ्याने मला दिला.
माझ्या घरातलं बाटलीबंद पाणी संपलं होतं. पण आता दुसऱ्या दिवशी येण्याशिवाय कोणताही पर्याय माझ्याकडे नव्हता.
पुढच्या दिवशी सकाळीही दुकानाबाहेर मोठी रांग होती. वस्तू लवकर संपत होत्या. चीननंतर इटलीमध्ये लॉकडाऊन केल्याच्या बातम्या आणि त्यानंतर अमेरिकेत वाढत असलेल्या कोरोना व्हायरसग्रस्तांची संख्या यामुळे अमेरिकेतील अनेक भागांमध्ये गदारोळ माजला आहे.
कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेत आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय कोरोना व्हायरसचे 600 नवे रुग्ण आढळून आले आहे.
त्यामुळे अमेरिकेत कोरोना व्हायरसची दहशत वाढत चालली आहे. माझ्यासारखे अनेक लोक व्हायरसच्या भीतीने घराबाहेर पडायला सुद्धा घाबरत आहेत.
भीतीचं वातावरण
कॅलिफोर्नियामध्ये एका तंत्रज्ञान कंपनीत असलेले आणि इंडिया कम्युनिटी सेंटरचे (आयसीसी) सीईओ राज देसाई सांगतात, की इटलीप्रमाणे अमेरिकेतही लॉकडाऊन होईल याची इथल्या लोकांना भीती वाटते.
देसाईंच्या मते, कॅलिफोर्नियाच्या बे परिसरात दोन लाखांहून अधिक भारतीय काम करतात किंवा राहतात.
लोक गरजेच्या वस्तूंचा साठा करत असल्याचं ते सांगतात. आम्ही आमच्या सदस्यांसाठी सॅनिटायझर उपलब्ध करून देत आहोत, असं राज देसाईंनी सांगितलं. सॅनिटायझरची बाजारात कमतरता आहे.
चार वेगवेगळ्या भागातील 600 ज्येष्ठ व्यक्तीही आयसीसीचे सदस्य आहेत. वृद्ध व्यक्तींना कोरोना व्हायरसचा धोका जास्त आहे.
एका दुकानाबाहेर तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. इथं टॉयलेट पेपर, सॅनिटायझर आणि पाणी विकत घेण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. त्यानंतर इथं गोंधळ माजला.
अमेरिकेत आणीबाणी
निवडणुकीच्या वर्षात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यासाठी ही वाईट बातमी आहे. आर्थिक क्षेत्रात केलेलं काम हा ट्रंप यांनी निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनवला आहे.
पण कोरोना व्हायरसमुळे अमेरिकन नागरिकांच्या मृत्यूचा परिणाम शेअर बाजारावरही झाला असून निर्देशांक गडगडला आहे.
प्रशासन कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यात अपयशी ठरलं आणि आता त्यासाठी प्रयत्न होत असल्याचं केवळ भासवलं जात आहे, असा आरोप करण्यात येत आहे.
व्हायरसवरचं औषध तयार करण्यासाठी आणि स्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी आठ अब्ज डॉलरचा आपात्कालिन निधी वापरण्यात येत आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रंप, उपराष्ट्राध्यक्ष आणि ट्रंप सरकारशी संबंधित अनेकजण सातत्याने टीव्हीवर दिसत आहेत. कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईची माहिती ते लोकांना देत आहेत.
पण व्हायरसमुळे मृत्यू आणि संसर्ग झालेल्यांची संख्या वाढतच चालली आहे. या जीवघेण्या व्हायरसला रोखण्यासाठी वॉशिंग्टन, कॅलिफोर्निया, फ्लोरिडा आणि न्यूयॉर्क या राज्यांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.
उपचार महाग
चीनला न गेलेल्या किंवा व्हायरसग्रस्त भागातून आलेल्या व्यक्तीशी संपर्कात न आलेल्या लोकांनाही कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचं अमेरिकेत दिसून आलं आहे.
आणीबाणी घोषित झाल्यामुळे राज्यांना अनेक अधिकार मिळतात. ते या स्थितीत अनेक योजना सुरु करु शकतात.
राजधानी वॉशिंग्टन आणि परिसरात कोरोना व्हायरसग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. तसंच अमेरिकन संसदेतील खासदारांनासुद्धा लोकांपासून वेगळं राहावं लागत आहे.
अमेरिकेत कोरोना व्हायरस किती पसरता किती पसरला याची माहिती मिळू शकली नाही. याची चाचणी करण्याची फी जास्त असल्याचं सांगितलं जात आहे.
कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. इटली आणि चीनप्रमाणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही.
राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी याबाबत एक ट्वीट केलं. "मागच्या वर्षी साध्या फ्लूमुळे 37 हजार अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला होता. साधारणपणे दरवर्षी 27 हजार ते 70 हजार लोकांचा फ्लूमूळे मृत्यू होतो. आयुष्य आणि अर्थव्यवस्था पुढे चालत राहते."