नागपुर येथिल हॉस्पिटल मधून 14 मार्च रोजी कोरोना व्हायरसचे चार संशयित रुग्ण पळून गेले होते. पोलिसांनी त्यांचा तातडीनं शोध घेत पकडलं. त्यांची चाचणी घेण्यात आली आणि यातील कुणालाच कोरोना व्हायरसची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं.
पळालेले संशयित रुग्ण सापडले असले, तरी या घटनेनं नव्या प्रश्नांना वाचा फोडलीय - रुग्णालयातून रुग्ण पळून का जातात? हॉस्पिटलला जायची, उपचार घ्यायची भीती कशासाठी?
डॉक्टर आणि मानसोपचार तज्ज्ञांशी बातचीत करून बीबीसी मराठीनं या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी नागपुरात नेमकं काय झालं, हे थोडक्यात पाहूया.
नागपुरात नेमकं काय झालं?
14 मार्च 2020 रोजी कोरोना व्हायरसच्या संशयित रुग्णांनी हॉस्पिटलमधून पळ काढल्याची घटना नागपुरात घडली. नागपूरच्या मेयो रुग्णालयातून शनिवारी कोरोनाच्या चार संशयित रुग्णांनी पळ काढला. पोलिसांनी तातडीनं शोध सुरू केला आणि चारही जण आपापल्या घरी आढळून आले.
मेयो रुग्णालयात कोरोनाची लागण झालेला रुग्ण असल्याची अफवा पसरली आणि रुग्णांमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर संधी साधून एका मागून एक असे चार रुग्ण वॉर्डातून निघून गेले.
हे सर्वजण स्वच्छतागृहाला जाण्याच्या बहाण्याने एकापाठोपाठ एक रुग्णालयातून बाहेर पडले आणि पसार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेनंतर नागपूरच्या मेयो शासकीय हॉस्पिटलमधील ज्या वॉर्डात कोरोनाग्रस्त रुग्ण आणि संशयित रुग्ण ठेवण्यात आलेत, त्या वॉर्डबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.
या चारही जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली नसल्याचं रिपोर्टमधून स्पष्ट झालंय. मात्र या घटनेमुळं अनके प्रश्नांनी तोंड वर काढलं.
लोक पळून का जातात?
रुग्ण हॉस्पिटलमधून पळून का जातात? वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटतं लोक सध्या घाबरलेले आहेत आणि त्यांच्यापर्यंत पुरेशी माहिती पोहोचलेली नाही.
मानसोपचार तज्ज्ञ अक्षता भट सांगतात की कोरोना व्हायरसची जसजशी नवनवी माहिती समोर येतेय, आकडेवारी समोर येतेय, त्यामुळं लोकांमध्ये भीती निर्माण होऊ लागलीय.
कोरोना व्हायरसची चाचणी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेले लोक पळण्याची तीन कारणं अक्षता भट सांगतात :
- आपली ओळख उघड होईल, अशी भीती लोकांना वाटते. कारण अशा संशयितांवर हल्ला होण्याची भीती असते.
- कोरोना व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली तर पुढे काय? कुटुंबापासून किती काळ दूर राहावं लागेल, याची चिंता वाटू लागते.
- आपल्याला क्वॉरंटाईन केल्यानंतर आपल्यावर काही प्रयोग केले गेले तर? अजून उपचार नाहीत, मग क्वॉरंटाईनमध्ये ठेवून नक्की काय करणार? अशा शंका लोकांच्या मनात असल्याच्या दिसतात.
मात्र, त्याचवेळी अक्षता भट म्हणतात, "डॉक्टरांनी चाचणी करण्यास सांगितल्यास चाचणी करून घ्यायला हवी. याचं कारण, तुमच्यामुळं इतरांना लागण होऊ शकते. स्वत:बरोबर इतरांचाही विचार करायला हवा. शिवाय, चाचणी केल्यास आपल्याही मनातील भीती निघून जाईल."