कोरोना व्हायरस महाराष्ट्रात वेगाने पसरतोय आणि आता मुंबईत मृत्यूही झाला आहे. जगभरात तर साडेसहा हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. कोरोना विषाणूवर लस शोधण्याचे प्रयत्न जगभर होताना दिसत आहे.
2019च्या डिसेंबर महिन्यात चीनमधल्या वुहान शहरात न्युमोनियामुळे अचानक लोकांचे मृत्यू होत असल्याचं पुढे आलं. याचं कारण ठाऊक नव्हतं म्हणून जानेवारी 2020मध्ये चौकशी सुरू झाली आणि हा व्हायरस नवा असल्याचं लक्षात आलं. आता मार्च महिना सुरू आहे. म्हणजे हा रोग प्राण्यांमधून माणसांमध्ये शिरून साधारणतः 3 महिने झाले आहेत.
कोरोना व्हायरसवर उपचारासाठी औषध किंवा लस केव्हा तयार होईल?, असा प्रश्न तेव्हा सोशल मीडियावर विचारला जात आहे.
या व्हायरसची बाधा जगातल्या 100 पेक्षा जास्त देशांतल्या दीड लाखांहून जास्त लोकांना झाली आहे. जगभरात साडेसहा हजारहून अधिक लोकांचे जीव गेले आहेत.
पण हे सगळं होत असताना कोरोनाची लस शोधण्याचं काम अतिशय वेगाने जगात अनेक ठिकाणी सुरू आहे.
लस तयार झाली, पण...
अमेरिकेतील सिएटल येथील कैसर पर्मनंट रिसर्च सेंटरमध्ये कोरोनाची लस तयार करण्यात आली आहे. या लशीचं नाव mRNA-1273 असं आहे. पण ही लस लोकांना कोरोनापासून वाचवेल की नाही, हे तपासण्यात येतंय. आजच बातमी आली आहे की या लशीची चाचणी 4 माणसांवर करण्यात आली आहे.
ही लस खरंच परिणामकारक आहे की नाही हे कळण्यासाठी काही महिन्यांचा वेळ लागणार असल्याचं संशोधकांनी सांगितलं आहे.
जेव्हा लस तयार करतात तेव्हा मृत किंवा दुर्बल व्हायरस वापरतात. उदाहरणार्थ पोलिओ होऊ नये म्हणजे जी लस देतात त्यात पोलिओचेच दुर्बल व्हायरस असतात.
पण कोविडची mRNA-1273 ही लस कोरोना व्हायरसपासून बनवलेली नाहीये. तर या व्हायरसचा जेनेटिक कोड कॉपी करून त्यातला छोटसा भाग प्रयोगशाळेत तयार करण्यात आला आणि त्यापासून ही लस बनवली आहे.
या लशीतले व्हायरस अर्धवट आणि दुर्बल आहेत, त्यामुळे ते काही धोकायदायक नाहीत. पण ते शरीरात गेले की आपलं शरीर या व्हायरसविरोधात लढण्याची तयारी करतं. त्यामुळे जेव्हा खऱ्या कोरोना व्हायरसचा हल्ला होईल, तेव्हा आपल्या शरीराची तयारी पूर्ण झाली असेल आणि आपण हल्ला आरामात परतवून लावू.
या लशीची चाचणी ज्या रुग्णांवर होत आहे त्यांची स्थितीवर बारीक लक्ष ठेवलं जातंय. 28 दिवसानंतर पुन्हा त्या रुग्णांवर या लशीची चाचणी केली जाईल.
अजून वाट पाहावी लागणार...
ब्रिटनमधल्या इंपीरियल कॉलेजच्या साथीच्या रोगांच्या विभागातही कोरोना विषाणूच्या लशीवर काम सुरू आहे. या विभागाचे प्रा. प्राध्यापक रॉबिन शटॉक सांगतात, "आधी लस तयार करायची म्हटलं तर त्यावर संशोधन करून, चाचणी घेऊन ती सर्वसामान्यांना उपलब्ध करून देईपर्यंत 10 वर्षांहून अधिक काळ लागायचा. पण सध्या आम्ही ज्या तंत्रज्ञानावर काम करतोय ते तंत्रज्ञान आपला वेळ वाचवणारं आहे. आम्ही ज्या पद्धतीने काम करत आहोत त्यानुसार ही लस काही महिन्यांत तयार होऊ शकते."