पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, "कालच्या पत्रकार परिषदेनंतर 5 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे आता पुण्यात एकूण 15 पॉझिटिव्ह केसेस आढळल्या आहेत. या 5 पैकी 4 रुग्ण विदेशात गेलेले नव्हते. त्यामुळे ही चिंतेची बाब आहे."
"आतापर्यंत 294 रिपोर्टचे सॅम्पल घेण्यात आले होते. त्यापैकी 15 वगळता बाकी निगेटिव्ह आले असून अजून 21चे रिपोर्ट येणे बाकी आहे," असंही ते म्हणाले.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 32 झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबईत जमावबंदी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुंबईत जमावबंदीसाठी कलम 144 लागू करण्यात आलं आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 32 झाली आहे, तर देशात आकडा 107 आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
31 मार्चपर्यंत ही जमावबंदी लागू असेल. मुंबई पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी जमावबंदीचा आदेश लागू केला.
31 मार्चपर्यंत कोणत्याही स्वरूपाची सहल काढता येणार नाही. खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल्सद्वारे कोणत्याही ठिकाणी जाण्यावर निर्बंध असेल. मुंबई दर्शनसह बिझनेस टूरही रद्द करण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये, खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदी लागू करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. या आदेशाचं उल्लंघन केल्यास शिक्षेला सामोरं जावं लागेल.
सर्वसाधारणपणे अनुचित प्रसंग टाळण्यासाठी जमावबंदीचा आदेश लागू केला जातो. मात्र सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
मुंबई, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील जिम, स्वीमिंग पूल, व्यायामशाळा, चित्रपटगृहं, नाट्यगृहं तात्पुरते बंद ठेवण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली होती.
मुंबई आणि पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना उद्धव ठाकरे यांनी या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकारनं घेतलेल्या खबरदारींच्या उपायांची माहिती सभागृहाला दिली.
पुण्यात आतापर्यंत कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानं पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील शाळा बंद ठेवण्यात येतील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. विनाकारण भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी मुंबईमधल्या शाळांबद्दल निर्णय अजून घेतला नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
शाळा आणि महाविद्यालयाच्या परीक्षांचं वेळापत्रक पुढं ढकलण्याबद्दल विचार करत असल्याचं त्यांनी म्हटलं. आपल्याकडे कोरोनाचे रुग्ण आता सापडत आहेत. अशावेळी पुढचे काही दिवस काळजी घेण्याची आवश्यकता असल्यानं परीक्षा आधी घेण्याऐवजी उशीरा घेतल्या जातील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
रेल्वे आणि बस या अत्यावश्यक सेवा असल्यानं बंद ठेवल्या जाणार नाहीत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
नागपूरमध्ये कोरोनाचे अजून दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. नागपूरमधील कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता 3 झाली आहे. नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी ही माहिती दिली आहे.