पुण्यात आणखी एका व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याच स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पुण्यातला आकडा आता 18 गेला आहे.
18 मार्च
फ्रान्स आणि नेदरलँडहून परतलेल्या एका व्यक्तीला पुण्यात कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पुण्यातल्या रुग्णांची संख्या 18 झाली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याची माहिती दिली आहे. आता महाराष्ट्रातल्या एकूण रुग्णांची संख्या 42 झाली आहे. तर भारतातल्या एकूण रुग्णांची संख्या 130 वर गेली आहे.
17 मार्च
मुंबईतल्या कॉर्पोरेट सेक्टरने वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडला आहे. 100 टक्के सर्व कपन्यांनी हे मान्य केल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी हे सांगितलं आहे.
बँका, औषध, मनोरंजन क्षेत्रातल्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करू देण्याचा पर्याय दिला आहे. परिणामी मंबईतली खासगी कार्यालयं आता काही काळासाठी बंद राहणार आहेत.
मास्क, पीपीईचे किट, व्हेंटिलिटर, आयसोलेटेड वॉर्ड संदर्भात पुरवठा करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. कपड्यांची दुकानं, दागिन्यांची दुकानं असे नॉन इसेंशियल उद्योग बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हातावर पोट असणाऱ्या म्हणजे असंघटीत क्षेत्राच्या उपजीविकेवर परिणाम होणार नाही याची काळजी घेणार, असं टोपे यांनी सांगितलं आहे.
कोल्हापूर अंबाबाई मंदिर अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने हा निर्णय घेतला आहे. तसेच जोतिबा यात्राही रद्द करण्यात आली आहे.
MPSC पूर्वपरीक्षा वेळापत्रकानुसार
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या गोष्टी रद्द होत असल्या तरी 5 एप्रिल रोजी होणारी MPSCची पूर्व परीक्षा वेळापत्रकाप्रमाणे होणार आहे.
MPSC एक पत्रक प्रसिद्ध करून याची
तसंच 31 मार्च नंतर गरज पडल्यास त्याचा फेरआढावा घेऊन परिक्षेच्या वेळपत्रकाबाबत निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
महाराष्ट्रात पहिला बळी
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा पहिला बळी गेला आहे एएनआय या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे.
मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात 64 वर्षांच्या पुरुषाचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. देशातल्या बळींची संख्या आता 3 झाली आहे.
त्यामुळे आता महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 38 झाला आहे.
मृत व्यक्ती दुबईहून परत आली होती. सुरुवातीला त्यांना कुठलाही त्रास नव्हता. मात्र दोन दिवसांनंतर त्यांची तब्येत बिघडली, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
पण हा मृत्यू कोरोनामुळेच झाला आहे का हे स्पष्ट झालं नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
महत्त्वाचे अपडेट्स
- होम क्वारंटाईन करण्यात आलेल्यांच्या बोटाला शाई लावली जाणार
- महत्त्वाची धार्मिक स्थळं 31 मार्चपर्यंत बंद
- देशातील बाधितांची संख्या 125
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेऊन पुढचे पंधरा दिवस आपल्या राज्यासाठी महत्त्वाचे असल्याचं स्पष्ट केलं आहे. सर्व गोष्टी जनतेच्या हितासाठी करतोय, त्यामुळं जनता स्वत:हून पुढे येऊन सहकार्य करेल, याची खात्री असल्याचं उद्धव यांनी म्हटलं. लॉक डाऊन करण्याची वेळ सध्या तरी आली नसल्याचंही उद्धव यांनी म्हटलं.
धार्मिक ठिकाणी गर्दी होऊ देऊ नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व धर्मांच्या धर्मगुरू, स्वामी, मंदिर, मशीद यांना केलं. राजकीय कार्यक्रम, जत्रा, मेळावे या सगळ्यांना पायबंद घातला पाहिजे, असंही उद्धव यांनी म्हटलं.
एसटी, रेल्वेच्या अधिकाऱ्यांना साफसफाईच्या सूचना दिल्या असल्याचं सांगून स्वच्छता कशी करावी, याचं एकच डिझाईन असावी, ती राज्य सरकारकडून एसटी आणि रेल्वेला दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. बस आणि लोकल बंद करण्याचा सध्या तरी विचार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
क्वारंटाईनमध्ये राहणं काही आनंददायी गोष्ट नाहीय. पण आपण खबरदारी म्हणून तसं करतोय. ज्यांना क्वारंटाईनमध्ये जायचं नसेल, ज्यांना घरातच राहायचं असेल, तर भान राखावं लागेल, असा सतर्कतेचा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, महाराष्ट्रात सर्व शाळा, महाविद्यालयं बंद करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. परीक्षा पुढे ढकलण्याचे आदेशही विद्यापीठांचे कुलगुरू आणि संबंधित परीक्षा विभागांना कळवण्यात आलंय.
केवळ दहावी आणि बारावीचे उरलेले पेपर घेतले जातील, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.