एकाच वेळी राजकारण, चित्रकला यांच्यासमवेत संगीत यांचे प्रेम जोपासणारा व जगणारा हळुवार मनाचा पण कट्टर विचारांचा नेता जगाच्या इतिहासात क्वचितच पाहायला मिळतो....शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त, त्यांच्या झंझावाती आणि अनेकदा वादग्रस्त ठरलेल्या व्यक्तिमत्त्वाची ही ओळख...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळपास पाच दशकांच्या राजकीय कारकीर्दीच्या काळात ते कायमच वेगवेगळ्या वादांच्या केंद्रस्थानी राहिले. त्यामुळे त्यांच्याबद्दल उलट-सुलट लिहिण्या-बोलण्याच्या अनेक संधी ते स्वत:च पत्रकार आणि राजकीय, सामाजिक नेत्यांना पुरवत राहिले. आता त्यांच्या मृत्यूला एक वर्ष उलटल्यानंतर त्यांच्याबद्दल आणखी वेगळे काय लिहायचे व वाचायचे, हा प्रश्न उपस्थित झाला तरी, बाळासाहेब या व्यक्तीच्या राजकीय ओळखीपलीकडे त्यांच्या स्वभावात, वागण्या-बोलण्यात इतक्या खुब्या होत्या की, त्यांची दखल घेतल्याखेरीज त्यांच्या झंझावाती आणि अनेकदा वादग्रस्त ठरलेल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख पूर्ण होऊच शकत नाही.
बाळासाहेबांचे जाहीर सभांतील बोलणे आणि वृत्तपत्रीय लिखाण हे दोन्ही झणझणीत आणि तिखट. त्यामुळेच अनेकांच्या कपाळावर घाम फुटायला आणि डोळ्यात पाणी तरळायचे. कुंचल्याच्या एका फटकाऱ्याने ते भल्याभल्यांना घायाळ करायचे, तसेच त्यांच्या एखाद्या वाक्याने शत्रू जायबंदीही व्हायचे. जाहीर सभेतील त्यांचे भाषण म्हणजे समोर बसलेल्या शेकडो-हजारो श्रोत्यांशी थेट संवाद वाटायचा. पण या वक्तव्यांच्या मागे खोलवर दडलेला विचार असायचा आणि एका विशिष्ट उद्देशाने व परिणामांची अपेक्षा ठेवूनच बाळासाहेब बोलत असत.
" alt="" aria-hidden="true" />
link