'शिवसेनेला आम्ही फसवलं, ही आमची चूकच'
महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युती कशामुळं तुटली, या प्रश्नाला अखेर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनीच पूर्णविराम दिलाय. "आम्ही शिवसेनेला फसवलं. मात्र, कधी ना कधी चूक सुधारू," असं सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत बोलताना म्हटलं. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
त्याचवेळी सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला इशाराही दिला. ते म्हणाले, "आमच्या चुकीचा तुम्ही एवढा फायदा उचलू नका. राज्यातही कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईलच."
विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजप युती तुटली. तीस वर्षे हे दोन्ही पक्ष एकत्र होते. त्यानंतर शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पारंपरिक विरोधकांसोबत एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. उद्धव ठाकरे यांनी स्वत: मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतली आणि राज्य सरकारचे शंभर दिवसही पूर्ण केले.
याच निमित्तानं विधानसभेत सुरू असलेल्या चर्चेत सुधीर मुनगंटीवार यांनी युती तुटण्याच्या चुकीची कबुली देत, काँग्रेस-राष्ट्रवादीलाही इशारा दिला.