१० मार्च म्हणजेच होळीच्या मुहूर्तावर सुरु होणाऱ्या वैजू नंबर वन मालिकेची सध्या कमालीची उत्सुकता आहे. या मालिकेत वैजूची भूमिका साकारणाऱ्या सोनाली पंडीतची मालिकेसाठी निवड हटके पद्धतीने झालीय. त्याच निमित्ताने सोनाली पाटीलशी साधलेला हा खास संवाद.
वैजू नंबर वन मालिकेसाठी तुझी निवड कशी झाली?
वैजूसाठी माझी निवड होणं ही स्वप्नवत गोष्ट आहे. खरतर मी पेशाने शिक्षिका आहे. एम ए, बीएड आणि त्यानंतर एमबीए असं शिक्षण घेतल्यानंतर मी कोल्हापूरातील राजाराम ज्युनियर आणि सीनिअर कॉलेजला प्रोफेसर म्हणून काम केलं आहे. अभिनयाची आवड लहानपणापासूनच होती. याच आवडीमुळे सोशल मीडियावर मी माझे व्हिडिओज पोस्ट करायचे. मिनिटभराच्या व्हिडिओने जर इतरांच्या चेहऱ्यावर हसू उमटत असेल तर ते करायला काय हरकत आहे असं मला वाटतं. याच दरम्यान वैजू नंबर वन मालिकेसाठी ऑडिशन्स सुरु होते. बऱ्याच अभिनेत्रींची स्क्रीन टेस्ट घेण्यात आली होती. माझे व्हिडिओज पाहून मलाही ऑडिशनसाठी बोलवण्यात आलं. इतक्या अनुभवी अभिनेत्रींमधून माझी निवड होईल असं वाटलंच नव्हतं. पण वैजू नंबर वनच्या टीमला माझ्यातली चुणुक दिसली आणि माझी निवड झाली. माझ्यासाठी हा प्रवास स्वप्नवत आहे.