छत्रपती शिवाजी महाराज *** RAJE

Image result for छत्रपती शिवाजी


छत्रपती शिवाजी महाराजांना आपण जेव्हा युगप्रवर्तक म्हणतो तेव्हा शिवछत्रपतींच्या जन्मापूर्वीचे युग कसे होते आणि शिवछत्रपतींच्या राज्यकारभारातून नेमके कोणते युग सुरू झाले, हे पाहावे लागते. छत्रपतींना युगप्रवर्तक म्हणण्यासाठी एका महत्त्वाच्या परिवर्तनाकडे पाहावे लागते. ते म्हणजे छत्रपतींचे सरदार व अन्य पदाधिकारी यांपैकी कुणालाही छत्रपतींनी वतने दिली नाहीत. वतनदारी पद्धत बंद करून वेतन सुरू केले. वतनदारांना वेतनदार बनवण्याचे परिवर्तन कल्पनातीत आहे. शिवछत्रपतींच्या समकालीनांच्याच नव्हे तर त्यांच्यानंतर येणाऱ्या काळातही हे परिवर्तन खूप वेगळे आणि विचारपूर्वक केलेले होते, हे दिसून येते. वतनदारांना त्यांच्या वतनामध्ये सारा गोळा करण्याचा पूर्ण हक्क मिळत असे. त्याचा अनेक वेळा दुरुपयोग होत असे. वतनदारांमुळे राजा थेट प्रजेपर्यंत पोहोचू शकत नव्हता. त्या मार्गात वतनदारीची पोलादी भिंत उभी असायची. वतनदारांचे अन्याय, अत्याचार राजापर्यंत पोहोचत नसायचे. त्यामुळे राजा हा जनतेचा प्रगल्भ प्रतिनिधी बनायला हवा असेल तर वतनदारांच्या मध्यस्थांचा वर्ग नाहीसा केला पाहिजे या बिनतोड विचारातून वतनदारी पद्धत बंद करण्याचा क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतला.