मानव आणि इतर प्राण्यांमधील एक महत्त्वाचा फरक म्हणजे, ज्यावेळी एखादी आजार किंवा रोगाची साथ पसरते, त्यावेळी मानव आपल्या सुरक्षेबद्दल चिंतेत पडतो.
तसंच, मानव हा एकमेव असा प्राणी आहे, जो नकळतपणे त्याच्या चेहऱ्याला हात लावतो. हीच सवय कोरोना व्हायरसला पसरण्यास मदत करतेय.
'चेहऱ्याला हात लावण्याची सवय'
एका दिवसात आपण अनेकदा आपल्या चेहऱ्याला हात लावत असतो.
2015 साली ऑस्ट्रेलियात वैद्यकीय क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या तरुणांचा अभ्यास केला गेला. वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनाही ही सवय असल्याचं या अभ्यासातून समोर आलं.
खरंतर वैद्यकीय विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तरी चेहऱ्याला हात लावल्यानं असणाऱ्या धोक्यांबाबत जागृत राहायला हवं होतं. मात्र, त्यांनी एका तासात किमान 23 वेळा आपापल्या चेहऱ्याला हात लावल्याचं समोर आलं. तोंड, नाक आणि डोळे या अवयवांना या विद्यार्थ्यांनी वारंवार स्पर्श केला.
चेहऱ्याला वारंवार हात लावणं धोकायदायक असल्याचं जागतिक आरोग्य संघटना आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था सांगतात.
कोरोना व्हायरस पसरल्यानंतर सतर्कता म्हणून ज्या सूचना देण्यात आल्यात, त्यात प्रामुख्यानं हात स्वच्छ ठेवण्याच्या सूचनेवरच जोर देण्यात आलाय.
आपण सारखं चेहऱ्याला हात का लावतो?
मानव आणि आणखी काही सस्तन प्राणी चेहऱ्याला हात लावण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाही. बहुधा, हा मानवी विकासाचाच एक भाग असेल.
सस्तन प्राण्यांमधील काही प्रजाती चेहऱ्यावरील कचरा, कीडे इत्यादी गोष्टी हटवण्यासाठी चेहऱ्याला स्पर्श करतात. मात्र, मानव किंवा इतर काही सस्तन प्राणी इतर कारणांसाठी चेहऱ्याला वारंवार स्पर्श करत राहतात.
अमेरिकास्थित यूसी बार्कले विद्यापीठातील मानसशास्त्राचे प्राध्यापक डाचर केल्टनर सांगतात की, "कधी कधी एकप्रकारे स्वत:ला गोंजारण्यासारखं असतं. तर कधी कधी आपण आपल्या चेहऱ्याला अशाप्रकारे स्पर्श करतो की, जसं एखाद्या नाट्यगृहात नाटकातील दृश्य बदलताना पडद्याला इकडून तिकडं नेलं जातं. आपणही तसंच आपल्या चेहऱ्यावरील भावना बदलण्यासाठी स्पर्शाचा वापर करतो."
वर्तनशास्त्राचा अभ्यास करणारे तज्ज्ञ असं मानतात की, चेहऱ्याला स्पर्श करण्याचा संबंध स्वत:च्या भावना नियंत्रित करणं किंवा स्वत:कडे इतरांचा लक्ष वेधण्याशी आहे.
चेहऱ्याला नकळतपणे विनाकारण स्पर्श करणं मानवजातीचं हे मूळचं वर्तन असल्याचं जर्मनीतल्या लिपजिश विद्यापीठातले मानसशास्त्रज्ञ मार्टन ग्रनवाल्ड सांगतात.
ग्रनवाल्ड पुढे सांगतात, "स्वत:च्या चेहऱ्याला स्पर्श करणं हे स्वत:च्याच एखाद्या नियमाप्रमाणं असतात. खरंतर चेहऱ्याला करण्यात येणारे हे स्पर्श सर्वसाधारण संवादासाठी बनलेले नसतात. शिवाय, हे स्पर्श नकळतपणे केले जातात."
"या क्रिया भावनिक आणि मानसिक प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. शिवाय, ही सवय सर्वांना असतात," असंही ग्रनवाल्ड म्हणतात.
स्वत:च्या चेहऱ्याला स्पर्श केल्याचा परिणाम असा होतो की, अस्वच्छ गोष्टी आपल्या डोळे, तोंड, नाकात जातात. पर्यायानं त्या शरीरात जातात.
कोरोना व्हायरसशी संबंधितच बोलायचं झाल्यास, एखादी व्यक्ती शिंकल्यानंतर उडालेले थेंब दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात शिरतात.
तसंच, ज्या गोष्टीवर विषाणू असेल, अशा गोष्टीला स्पर्श केल्यानंतर त्याचा संसर्ग आपल्यालाही होऊ शकतो.
कोरोना व्हायरसबाबत तर धोकादायक बाबा अशी मानली जातेय की, कोरोनाचे विषाणू कुठल्याही ठिकाणी 9 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात.
व्हायरस अधिक दिवस जिवंत राहण्याचा धोका
व्हायरस अधिक दिवस जिवंत राहू शकत असल्यानं आपण चेहऱ्याला स्पर्श करणं धोकादायक ठरू शकतं.
2012 साली अमेरिका आणि ब्राझिलमधील संशोधकांना असं लक्षात आलं की, सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वस्तूंना सर्वसामान्य लोक एका तासात तीनपेक्षा अधिक वेळा स्पर्श करतात. हेच लोक आपल्या चेहऱ्याला तासाभरात 3.6 वेळा स्पर्श करतात.