दलित जावयाच्या हत्येचा आरोप असणाऱ्या सासऱ्याची आत्महत्या

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या हैदराबाद ऑनर किलिंग प्रकरणाने आता एक वेगळं वळण घेतलं आहे. दलित मुलाशी लग्न केल्याचा राग मनात ठेवून पेरुमल प्रणय याची हत्या केल्याचा आरोप असणाऱ्या तिरुगर मारुती राव यांनी आत्महत्या केली आहे.


प्रणयची 14 सप्टेंबर 2018 रोजी हत्या करण्यात आली होती. मारुती राव याची मुलगी अमृता आणि प्रणय यांचा विवाह झाला होता. मारुती राव यांना सहा महिन्यांनंतर जामीन मिळाला होता. पोलिसांनी या मृत्यूची नोंद संशयास्पद मृत्यू अशी केली आहे.


मारुती राव याचं गाव नलगोंडा जिल्ह्यात आहे. शनिवारी रात्री मारुती राव खैरताबाद इथे आर्य व्यास भवन येथे एका खोलीत उतरले होते.


रविवारी सकाळी त्यांच्या पत्नीने आणि नंतर आर्य व्यास भवनाने फोन करुनही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांना बोलवण्यात आले. तेव्हा ते मृतावस्थेत सापडले. मारुती राव यांचा मृतदेह उस्मानिया हॉस्पिटलमध्ये विच्छेदनासाठी पाठवला आहे.


मारुती राव यांच्या मृत्यूवर त्यांची मुलगी अमृता यांची प्रतिक्रिया बीबीसी तेलुगुने घेतली. त्यांनी सांगितलं की प्रणयच्या हत्येनंतर मी माझ्या वडिलांबरोबर बोलणं सोडलं होतं. प्रणयच्या हत्येचा कदाचित त्यांना पश्चाताप झाला असावा असं अमृता यांनी सांगितलं.


काय आहे प्रकरण?


तेलंगणच्या नलगोंडाच्या जिल्ह्यात ऑनर किलिंगचं हे प्रकरण समोर आलं होतं. जिल्ह्यातील मिर्यालगुडा शहराच्या बाहेर 24 वर्षीय पेरुमल्ला प्रणय या युवकाची त्याच्या गरोदर पत्नीसमोर निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.


डॉक्टरकडून पत्नीची तपासणी करून ते दोघं हॉस्पिटलमधून बाहेर पडले होते. तेव्हा दोन अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्रांनी प्रणयच्या मानेवर जोरदार प्रहार केले. त्यात प्रणयचा जागच्या जागीच मृत्यू झाला.


प्रणय आणि अमृता यांचं यावर्षी 31 जानेवारीला लग्न झालं होतं. त्यांचा प्रेमविवाह होता आणि त्यामुळेच दोघांचे कुटुंबीय त्यांच्यावर नाराज होते. दरम्यान प्रणयच्या घरच्यांनी अमृताला स्वीकारलं होतं. अमृताच्या घरचे मात्र नाराज होते.