ज्योतिरादित्य शिंदे : जेव्हा विजयाराजे शिंदेंनी काँग्रेसमधून फुटून मध्य प्रदेशमधलं सरकार पाडलं

Image result for vijayaraje scindia


एखाद्या आईवर स्वतःच्या मुलाविरोधात प्रचार करण्याची वेळ भारतीय राजकारणात पहिल्यांदाच आली असावी. 1984 साली ती वेळ ग्वाल्हेरमध्ये आली. विजयाराजे शिंदे आणि माधवराव शिंदे हे या माता आणि पुत्राला एकमेकांच्या विरोधात राजकीय प्रचार करण्याची वेळ आली.


एका बाजूला स्वतःचा पुत्र माधवराव शिंदे आणि दुसऱ्या बाजुला 'धर्मपुत्र' अटलबिहारी वाजपेयी अशा विचित्र कोंडीत राजमाता विजयाराजे सापडल्या होत्या.


1984 साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर लोकसभेची निवडणुकीचं पुन्हा एकदा रणशिंग फुंकलं गेलं. सर्व सहानुभूती काँग्रेसच्या बाजूने असल्याचं तेव्हा स्पष्ट दिसतच होत. त्यामुळे लोकसभा प्रवेशासाठी अटलबिहारी वाजपेयी यांना सुरक्षित मतदारसंघ निवडण्याची गरज होती.


त्यामुळेच वाजपेयी यांनी ग्वाल्हेरची निवड केली. एकतर या मतदारसंघाचं त्यांनी 1971 साली प्रतिनिधित्व केलं होतं. ते त्यांचं जन्मगावही होतं. त्यामुळे त्यांना हा मतदारसंघ सुरक्षित वाटला असावा. पुन्हा मदतीसाठी राजमाता होत्याच.


माधवराव शिंदे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर शेजारच्या गुणा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं निश्चित केलं होतं. त्यामुळे वाजपेयी यांना लोकसभा प्रवेशासाठी हा एक आदर्श मतदारसंघ वाटणं अगदीच साहजिक होतं. त्यांच्याविरोधात काँग्रेसने विद्या राजदान यांना उमेदवारी दिली होती.


पण सगळं ठरल्यासारखं होणार नाही हे निवडणुकीच्या आधीच दिसून आलं. निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या शेवट्या दिवशी मुदत संपायच्या फक्त दीड तास आधी माधवराव शिंदे आपल्या सहकाऱ्यांबरोबर ग्वाल्हेरमध्ये आले आणि त्यांना ग्वाल्हेरमधून अर्ज भरला. अटलबिहारी वाजपेयी यांना यावर काहीच करता आले नाही. आता माधवराव शिंदे विरुद्ध अटलबिहारी वाजपेयी असा सामना अटळ होता.


आपण विजयाराजे शिंदे यांचे धर्मपुत्र आहोत असं अटलबिहारी वाजपेयी यांनी जाहीर केल्यामुळे विजयाराजे यांच्यासमोर आता कोणाच्या विरुद्ध प्रचार करायचा असा पेच निर्माण झाला. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात म्हणजेच आपल्याच मुलाच्या विरोधात प्रचार करण्याचं निश्चित केलं. वीर संघवी आणि नम्रता भंडारे यांनी लिहिलेल्या अ लाइफ ऑफ माधवराव सिंदिया या पुस्तकात या सर्व घटनेचा साद्यंत वृत्तांत प्रसिद्ध झाला आहे.


विजयाराजेंचे प्रयत्न अपुरे पडले. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसबद्दल निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेमध्ये माधवराव शिंदे विजयी झाले. पण या निमित्तानं ग्वाल्हेरच्या या राजघराण्यातल्या आई-मुलाचे ताणलेले नातेसंबंध पुन्हा एकदा सगळ्यांसमोर आले. या निवडणुकीच्या काळात विजयाराजेंनी 'मुलांनी आपल्या आयांना अशा अग्निपरीक्षेला सामोरं जायला लावू नये,' असं म्हटलंही होतं.


ज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर या इतिहासाला पुन्हा उजाळा दिला जातोय. पण शिंदे कुटुंबाचा इतिहासच नाही तर वर्तमानही ज्योतिरादित्यांनी काँग्रेस सोडेपर्यंत दोन पक्षांत विभागलेला होता.


विजयाराजेंच्या म्हणजे आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत वसुंधराराजे (राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री) आणि यशोधराराजे या भाजपमध्ये गेल्या. माधवराव शिंदे आणि त्यांचे पुत्र ज्योतिरादित्य हे काँग्रेसमध्येच राहिले. शिंदे घराणं असं दोन विचारधारांमध्ये कसं आणि कधी विभागलं गेलं? या राजकीय ताण-तणावाचे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर नेमके काय परिणाम झाले? ज्योतिरादित्य शिंदेंनी घेतलेल्या राजकीय यू-टर्नच्या निमित्तानं या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणंही रंजक आहे.


जेव्हा विजयाराजेंनी काँग्रेसचं सरकार पाडलं होतं...


मध्य प्रदेशच्या स्थापनेनंतर 1957 साली झालेल्या निवडणुकीत जिवाजीराजेंच्या पत्नी आणि माधवराव शिंदेंच्या आई विजयाराजे शिंदेंनी गुणा मतदारसंघामधून निवडणूक लढवली आणि त्या जिंकूनही आल्या.


तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी आधी महाराज जिवाजीराव शिंदे यांनाच काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची विनंती केली होती. मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर विजयाराजे शिंदेंना निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली. प्रचंड बहुमतानं निवडून येत त्या खासदारही झाल्या.


ग्वाल्हेरमध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या दरम्यान विजयाराजेंचे तत्कालीन मुख्यमंत्री डी.पी. मिश्रांसोबत मतभेद झाले. त्यासोबत सरगुजा प्रांतात करण्यात आलेल्या पोलीस कारवाईमुळेही त्या नाराज झाल्या होत्या. त्यांनी 1967 साली काँग्रेसला रामराम केला.


"विजयाराजेंनी त्यावेळी काँग्रेसचं सरकार पाडण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या सांगण्यावरून 37 आमदारांनी राजीनामे दिले आणि डीपी मिश्रांचं सरकार कोसळलं. त्यानंतर संयुक्त विधायक दलाचं सरकार स्थापन झालं. गोविंदनारायण सिंह मुख्यमंत्री झाले. मध्य प्रदेशमधल्या काँग्रेसच्या वर्चस्वाला पहिल्यांदा तडा गेला," अशी आठवण प्रजातंत्रचे डिजिटल एडिटर प्रकाश हिंदुस्तानी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितली.


जनसंघ आणि भाजपच्या स्थापनेतही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. 1971 साली इंदिरा लाटेतही जनसंघाला मध्य प्रदेशमध्ये तीन जागा जिंकता आल्या. स्वतः विजयाराजे भिंडमधून निवडून आल्या. अटलबिहारी वाजपेयी ग्वाल्हेरमधून निवडून आले.


ज्योतिरादित्य शिंदेंचे पिता माधवराव शिंदे हेसुद्धा या निवडणुकीत पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आले. गुणा मतदारसंघातून वयाच्या 26 व्या वर्षी माधवराव खासदार बनले होते. तेही जनसंघाच्या तिकिटावर. इथपर्यंत सर्व काही आलबेल होतं. आपल्या कुटुंबानं भाजपमध्येच राहावं, अशी विजयाराजेंची इच्छा होती. पण माधवरावांचे विचार काही वेगळे होते.